सरकारनं माझ्यावर उपकार केले नाही - मसरत आलम

जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेते मसरत आलमच्या सुटकेवरुन वाद निर्माण झाला असतानाच माझी सुटका करुन जम्मू काश्मीर सरकारनं माझ्यावर उपकार केलेले नाहीत, असं विधान करत आलमनं आगीत तेल ओतलं आहे. आलमवर देशाविरोधात युद्ध पुकारणं आणि अन्य स्वरुपातील डझनभर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

Updated: Mar 8, 2015, 10:34 PM IST
सरकारनं माझ्यावर उपकार केले नाही - मसरत आलम title=

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेते मसरत आलमच्या सुटकेवरुन वाद निर्माण झाला असतानाच माझी सुटका करुन जम्मू काश्मीर सरकारनं माझ्यावर उपकार केलेले नाहीत, असं विधान करत आलमनं आगीत तेल ओतलं आहे. आलमवर देशाविरोधात युद्ध पुकारणं आणि अन्य स्वरुपातील डझनभर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. यानुसार मसरत आलमचीही शनिवारी सुटका करण्यात आली आहे. २०१०मध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांना भडकावल्याप्रकरणी आलमविरोधात गुन्हा दाखल होता. आलमची माहिती देणाऱ्या तत्कालीन सरकारनं १० लाख रुपयांचं पारितोषिकही जाहीर केलं होतं. अशा वादग्रस्त नेत्याची सुटका केल्यानं सईद सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. 

तुरुंगातून सुटल्यावर आलमनं स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये वादग्रस्त विधान केले. माझी सुटका कायद्यानुसारच झाली असून पीडीपी-भाजपा सरकारनं माझ्यावर कोणतेही उपकार केले नाही, असं त्यानं सांगितलं. माझ्या सुटकेवर जर कोण गदारोळ उठवत असेल तर ती त्यांची डोकेदुखी आहे, असंही त्यानं म्हटलंय. सरकार बदललं असलं तरी प्रत्यक्षातील परिस्थिती कधीच बदल नाही, असं सांगत त्यानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 

जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपानं एकत्र येऊन सरकार स्थापन केलं असून आलमच्या सुटकेनं भाजपावरही टीका होत आहे. भाजपा आमदारांना अंधारात ठेवून हा निर्णय घेतला, असा दावा जम्मू काश्मीरमधील भाजपा प्रदेशाध्यक्ष जुगल किशोर यांनी केला. मुफ्तींच्या या निर्णयाविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनीही निदर्शनं केली. 
 
कोण आहे मसरत आलम?
४४ वर्षीय मसरत आलम हा फुटिरतावादी हुर्रियतचा नेता असून तो जम्मू काश्मीरमधील मुस्लीम लीगचे अध्यक्ष आहे. आलम हा हुर्रियतचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांचा उत्तराधिकारी म्हणून ओळखला जातो. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.