तिरुअनंतपुरम : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधलाय. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर अल्पसंख्यांक, जातीय हिंसा वाढल्या असून महिला आणि बालकांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचही त्या म्हणाल्या.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर मागील आठवड्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही टीका केली होती. संसदेत फक्त एकाच व्यक्तीचा आवाज ऐकला जातो. आता सोनिया गांधी यांनीही मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. केरळमधील एका कार्यक्रमात सोनिया गांधींनी हे वक्तव्य केले.
भाजप सरकार दंगली घडवून देशात फूट पाडण्याचे प्रयत्न करीत आहे. देशात नवे सरकार स्थापन होवून अकरा आठवड्यांचा कालावधी झालाय. या काळात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश अशा विविध राज्यांमध्ये दंगली झाल्या आहेत. जातीय दंगलीचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात दंगलीचे प्रमाण कमी होते, असा दावा सोनिया गांधी यांनी केला.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वक्यव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केलाय. काँग्रेस सरकार सत्तेतून गेल्यानंतर जातीय हिंसा कमी झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.