www.24taas.com, जाजपूर
चैनीच्या गोष्टीसाठी कोणीही काहीही करायला तयार असतात. अशीच एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. मोबाइल, जीन्सची पॅण्ट आदी वस्तू विकत घेण्यासाठी आपले स्वत:चे १७ महिन्यांचे मूल आईने विकल्याचे समोर आले आहे.
ओडिशा राज्याच्या जाजपूर जिल्ह्यातील एका २० वर्षांच्या महिलेने हे कृत्य पोलिसांनी उघड केले आहे. जाजपूर जिल्ह्यातील मुंदमाला गावातील राखी पात्रा या महिलेने पतीच्या जामिनासाठी मूल विकल्याची बातमी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाली होती. त्याची स्वत:हून दखल घेत ओडिशा उच्च न्यायालयाने विकलेले मूल शोधून काढून ते पुन्हा त्याच्या आईच्या हवाली करण्याचा आदेश दिला होता.
पोलिसांनी तपास केल्यानंतर भलतीच बाब पुढे आली आहे. राखीने आपला १७ महिन्यांचा मुलगा ५ हजार रुपयांना विकून त्या पैशातून मोबाइल, जीन्सची पॅण्ट, त्यावरील टॉप्स व मोबाइलसाठी मेमरी कार्ड्स खरेदी केल्याचे उघड झाल्याचे जाजपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीपक कुमार यांनी सांगितले.
या महिलेने रिक्षावाल्याच्या मदतीने १७ सप्टेंबर रोजी बाबुला बेहरा नावाच्या व्यक्तीला कटकमध्ये आपल्या मुलाला विकले होते. पोलिसांनी नुआपताना गावातून हा मुलगा मंगळवारी परत मिळविला. पण, मुलगा ताब्यात घेण्यास राखीने नकार दिला. अखेर, त्या मुलाला बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
राखीने गरिबीमुळे आपल्या पतीचा जामीन करायला पैसे नाहीत म्हणून मूल विकले नव्हते, हे स्पष्ट झाले आहे. मुलाला विकून मिळालेल्या पैशांतून मोबाइल फोन, जीन्सची पॅण्ट या वस्तू खरेदी केल्याची तिने कबुली दिली आहे. या सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत, असे पोलीस अधीक्षक दीपक कुमार यांनी सांगितले.