www.24taas.com, नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत जाऊन नवनिर्वाचित अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेतली. मोदींच्या या भेटीचं निमित्त होतं, ते केवळ राजनाथांचं अभिनंदन करायचं... पण तब्बल आडीच तास चाललेल्या या चर्चेत २०१४ च्या निवडणुकीचा विषय झाल्याचं दोघांनीही मान्य केलंय.
राजनाथ सिंहांच्या नावावर भाजप अध्यक्ष म्हणून एकमत झाल्यावर सर्वप्रथम त्यांना फोन गेला तो नरेंद्र मोदींचा... यावेळी मोदींनी प्रत्यक्षात येऊन शुभेच्छा देण्याची इच्छा व्यक्त केली आणि रविवारची ही भेट ठरली. मोदी आणि राजनाथ सिंह भेटले ते या पूर्वनियोजित शुभेच्छांसाठी... पण ही भेट चालली तब्बल आडीच तास... आधी भेट, नंतर एकत्र भोजन असा भरगच्च कार्यक्रम होता. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. पण २०१४ ची निवडणूक हा विषयही अजेंड्यावर प्रामुख्यानं असल्याचं या दोन्ही नेत्यांनी सांगितलं.
आगामी काळात मोदींच्या पक्षातल्या भूमिकेचा फेरविचार होण्याची शक्यता सिंह यांनी यापूर्वीच वर्तवलीय. शिवाय २०१४च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदी असावेत, असं अनेकदा अनेकांनी सुचवलंय. त्यामुळे मोदी-राजनाथ यांच्या या प्रदीर्घ चर्चेचा मुद्दा हाच असू शकतो, अशी कुजबुत आता पक्षवर्तुळात सुरू झालीय.