सरकार आणि राज्यपालांमध्ये रंगलंय राजीनाम्यावरून शीतयुद्ध

केंद्र सरकार आणि यूपीए सरकारनं नेमलेल्या काही राज्यपालांमध्ये सध्या राजीनाम्यावरून शीतयुद्ध रंगलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी पाच राज्यपालांना राजीनामे देण्याच्या सूचना केल्यात.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 17, 2014, 06:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्र सरकार आणि यूपीए सरकारनं नेमलेल्या काही राज्यपालांमध्ये सध्या राजीनाम्यावरून शीतयुद्ध रंगलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी पाच राज्यपालांना राजीनामे देण्याच्या सूचना केल्यात.
यात उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी, महाराष्ट्राचे के. शंकरनारायण, पश्चिम बंगालचे एम. के. नारायणन, गुजरातच्या कमला बेणीवाल यांचा समावेश आहे. यातल्या जोशींनी राजीनामा दिलाय.
दुसरीकडे केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिलाय तर आसामचे जे.बी. पटनाईक यांनी राजीनामा देणार नसल्याचं म्हटलंय. आपण राष्ट्रपतींची केवळ सदिच्छा भेट घेतली, असं ते म्हणाले. कर्नाटकचे राज्यपाल एच.आर. भारद्वाज यांनीही राजीनामा देणार नसल्याचं म्हटलंय. राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांनीही आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्या राष्ट्रपतींनाही भेटणार आहेत. मात्र त्यांनीही राजीनाम्याची शक्यता फेटाळलीये. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्यात.
राज्यपालाचं पद बिगर राजकीय असल्यामुळं राजीनामे घेणं अयोग्य असल्याचं राष्ट्रवादीचे नेते तारीक अन्वर यांनी म्हटलंय. संयुक्त जनता दलानंही घाई करणं योग्य नसल्याचं म्हटलंय. भाजपमधून मात्र राजीनाम्यांची मागणी केली जातेय. राज्यपालांनी स्वतःहून पायउतार व्हावं, असं भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय.
दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही आपण स्वतःहून राजीनामा दिला असता, असं म्हणत यूपीएनं नेमलेल्या राज्यपालांना अप्रत्यक्ष सल्ला दिलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.