शिक्षण क्षेत्रात सरकारचं योगदान शून्य - नरेंद्र मोदी

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचार समिती प्रमुख नरेंद्र मोदी आज पुण्यात आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्पी थिएटरच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ते पुण्यात दाखल झालेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 14, 2013, 04:04 PM IST

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचार समिती प्रमुख नरेंद्र मोदी आज पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्पी थिएटरच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित राहिले. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी भारतात शिक्षणाचा पाया कसा कमजोर आहे, यावर भर दिला. तसंच भारताच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचा पाया भक्कम असल्याची गरज त्यांनी व्यक्त केली

फर्ग्युसन सभागृह ही ऐतिहासिक जागा आहे याच जागेवर सावरकरांच्या सभा गाजल्या आणि त्याच जागेवर आपल्याला भाषणाची संधी मिळाली याबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी ‘भारतीय शिक्षणव्यवस्थेत शासनाचं योगदान शून्य आहे... अगोदर शिक्षण म्हणजे मॅन मेकिंग मशीन म्हणून ओळखलं जायचं आज मात्र शिक्षण म्हणजे मनी मेकिंग मशीन झालंय. शिक्षणामध्ये व्यक्तीमत्त्व विकासाला महत्त्व दिलं जावं’ असं मोदींनी म्हटलं.
यावेळी तरुणांसमोर भाषण करताना आपण सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहोत हे सांगायला ते विसरले नाहीत. ‘मी खासकरून ट्विटरवर जास्त अॅक्टीव्ह असतो. सोशल मीडियाच्या साहाय्यानं अनेक विद्यार्थी माझ्याशी संपर्क साधतात. जवळजवळ अडीच हजार युवकांनी मला चिठ्ठी सोशल मिडियाच्या साहाय्यानंच लिहिलीत’ असंही मोदींनी सांगितलंय.
'देशात अजूनही वेगवेगळ्या क्षेत्रात आपण पुढे जाण्याची गरज आहे. पर्यटन, कृषी क्षेत्राकडे सरकारचं दुर्लक्ष झालंय... शेतकरी अजूनही पुरातन तंत्रज्ञानात जगतोय... देशात संरक्षण अभियांत्रिकीमध्ये जायचं असेल तर अशी महाविद्यालयच उपलब्ध नाहीत'... माझ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते पण, चांगले शिक्षक निर्माण करण्याचीही गरज आहे... त्यासाठी आपण अगोदर गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे' असंही त्यांनी म्हटलंय.

‘आणि यासाठीच देशात भरीव संशोधनाची गरज आहे... आपल्याकडे संशोधनाला महत्त्व दिलं जायला हवं. निरंतर संशोधन हे सजीव जीवनाचं लक्षण असतं, संशोधनाला महत्त्व न देणारा देश थांबतो...’ असं म्हणताना बुद्धिमत्ता आणि विकास यांत पूल बांधला जावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. सोबतच देशातील संशोधनाची माहिती एकत्र का नाही? असा सवालही सरकारला विचारला. यावेळी ‘भारतात टॅलेन्ट नाही असं नाही, पण त्याचा योग्य वापर होत नाही’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.