लंडन : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य काही खुले होताना दिसत नाही. मोदी सरकारने २३ जानेवारीपासून नेताजीसंबंधीच्या फाईल्स सार्वजनिक करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली खरी. पण, त्यातून आत्तापर्यंत काही खास समोर आलेलं नाही.
नेताजींच्या कथित शेवटच्या दिवसांत त्यांच्यासाठी दुभाषी म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने नेताजींचा मृत्यू तैवानच्या ताइपेईतील एका लष्करी हॉस्पिटलमध्ये झाला, असा दावा केला आहे. काजुनोरी कुनीजुका असं या व्यक्तीचं नाव आहे.
काजुनोरी हे आजही जिवंत असून ते जपानमध्ये एका खेड्यातील वृद्धाश्रमात राहतात. आज त्यांचे वय ९८ वर्षे आहे. १९४३ ते १९४५ या काळात ते सुभाष बाबूंसोबत होते.
काजुनोरी यांच्या मते विमान दुर्घटनेतून नेताजी बचावले होते. जखमी नेताजींना ताइपेईतील एका रुग्णालयात दाखल केले गेले. पुढे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इंग्लंडमधील एका वेबसाईटच्या मते काजुनोरी कुनीजुका यांनी याविषयीचे वर्णन आपल्या डायरीत लिहून ठेवले आहे.