नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत आणखी एक खुलासा समोर आलाय. ब्रिटनच्या एका वेबसाईटचने दिलेल्या माहितीनुसार, तैपेईमध्ये विमान दुर्घटनेनंतर बोस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. १८ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांनी मृत्यूआधी डॉक्टरांना काही सांगितले. माझ्या शरीरातील रक्त मेदूंच्या दिशेने वाहतंय. मला थोडा वेळ झोपायचे आहे, हे नेताजी यांचे अखेरचे शब्द होते.
१८ ऑगस्ट १९४५ या रहस्यमयी दिवसाबाबतचे अनेक तथ्य WWW.BOSEFILES.INFO या वेबसाईटनं जगासमोर आणलेत. नेतांजींना जेव्हा रुग्णालयात आणलं गेलं तेव्हा डॉ. सुरुता त्या रुग्णालयात होत्या. १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी उशिरा त्यांनी नेताजींच्या मृत्यूची बातमी दिली.
याआधी १० जानेवारी रोजी या वेबसाईटनं प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्यानं नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाल्याचा दावा केला होता. या दिवशी नेताजींनी जपानी एअरफोर्सच्या विमानानं व्हिएतनामच्या टोरेन इथून प्रयाण केलं होतं असा दावा या वेबसाईटनं केला होता. यावेळी बोस यांच्यासह १२-१३ प्रवासी आणि काही क्रू मेंबरही होते. तसंच त्यांच्यासोबत लेफ्टिनेंट जनरल सुनाम्शा शिदेई हे सुद्धा होते.
हे विमान ताइपे, डेरेनमार्गे टोकियोला जाणार होते मात्र जपानी एअर स्टाफ ऑफिसर मेजर टारो कोनो यांनी या दुर्घटनेचा तपास करणा-या समितीला दिलेल्या माहितीचा उल्लेखही या बेवसाईटने केला होता. कोनो यांना सुरुवातीला विमानाच्या इंजिनात बिघाड असल्याचं जाणवलं. मात्र त्यानंतर उड्डाणासाठी विमान योग्य असल्याचं त्यांनी सांगितल्याचा उल्लेख यात आहे. मात्र विमानाचं उड्डाण होताच मोठा स्फोट झाल्याचं या वेबसाईटनं म्हटलं होतं.