नवी दिल्ली : तुम्ही जास्तीत जास्त किती वेळ जागं राहू शकता? एक दिवस... दोन दिवस... त्यापेक्षा जास्त दिवस नक्कीच नाही... पण, एका अशीही व्यक्ती आहे जी गेल्या 14 वर्षांपासून झोपलेली नाही...
काय... धक्का बसला ना! पण, हे खरं आहे. मेडिकल सायन्सनुसार कोणतीही व्यक्ती 80 तासांपेक्षा जास्त वेळ जागी राहू शकत नाही. पण, दक्षिण दिल्लीत राहणाऱ्या सतीश कुमार यांची झोप मात्र गेल्या 14 वर्षापासून गायब आहे. रात्रंदिवस जागं राहणाऱ्या या व्यक्तीला पाहून शेजारीही आश्चर्य व्यक्त करत आहेत. पण, हा प्रकार पाहून सतीश कुमार यांच्या डॉक्टरांनाही धक्का बसलाय.
गेल्या 14 वर्षांपासून झोपले नसले तरी सतीश कुमार पूर्ण स्वस्थ आहेत त्यांना कोणताही आजार नाही. ते इतरांसारखं दररोज आपल्या कामावरही जातात. सतीश यांनी आपल्या या आजाराबाबत एम्स, सफदरजंग, आरएमएलसारख्या मोठमोठ्या हॉस्पीटलचे खेटे घातलेत. पण, प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांनी त्यांच्यावर अविश्वास दाखवत त्यांना फार सिरीयसली घेतलं नाही. यानंतर मात्र सतीश यांनी आपला इलाज करणंही सोडून दिलंय. जर, डॉक्टरांना यावर विश्वास नसेल तर त्यांनी याबद्दल सीसीटीव्ही लावून आपली चौकशी करून पाहावी, असं सतीश यांनी म्हटलंय.
महत्त्वाचं म्हणजे, एका दिवसाची झोप जरी बिघडली तरी रक्तदाबापासून ते ब्लड शूगर पर्यंत आकडे वाढत जातात. पण, सतीश यांना असा कोणताही त्रास जाणवत नाहीय.
11 दिवस जागण्याचा रेकॉर्ड
यापूर्वी 1964 साली एका सायन्स फेअर दरम्यान 17 वर्षांच्या रॅंडी गार्डनर नावाच्या व्यक्तीनं सलग 264 तास जागून एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. यादरम्यान, या विद्यार्थ्यांला शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवला होता. यामुळे, मनुष्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांनीही म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.