www.24taas.com, बनासकाठा, गुजरात
निवडणूक आयोगाच्या एका दलानं (एसएसटी) गुरुवारी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील टोल प्लाझावर एका खाजगी सुरक्षा एजन्सीच्या गाडीतून तब्बल साडे नऊ करोडांची रोकड जप्त केलीय.
मेहसाणाचे जिल्हाधिकारी राजकुमार बेनीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेली रोकड सुरक्षा एजन्सीच्या एका गाडीतून हस्तांतरित होत होती. यासंबंधी एजन्सी अधिकाऱ्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मात्र मिळालं नाही. नऊ कोटी ३० लाख रुपयांची ही रक्कम अहमदाबादच्या आयसीआयसीआय बँक आणि त्याच्या इतर शाखांमधून काढण्यात आली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारीही निवडणूक आयोगानं कारवाई करत साबरकाठा जिल्ह्यातील खेदब्रह्मामदून एपीएमसीच्या अध्यक्षाकडून पाच लाख रुपये जप्त केले होते. तसंच सोमवारी हिंतनगर-मेहसाणा मार्गावर असलेल्या विजापूर तालुक्यातून ७० लाख रुपये जप्त करण्यात आले.
गुजरातमध्ये १३ डिसेंबर आणि १७ डिसेंबर विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. यामध्ये १८२ सदस्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं कठोर कारवाईची भूमिका घेतलीय.