नवी दिल्ली : धनगर समाजाला एसटीत आरक्षण देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकार दिला आहे. तर वेगळ्या ओबीसी मंत्रालयाची गरज नसल्याचेही पंतप्रधानांनी या बैठकीत स्पष्ट केलं आहे. नक्षलवाद कमी करण्यासाठी सरकारने खूप काम केल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातल्या खासदार आणि मंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाळा घेतलीय. नरेंद्र मोदी यांच्या ७ लोककल्याण मार्गावरच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. सरकारच्या योजना खासदारांनाच माहिती नसतील तर त्या लोकांपर्यंत कशा पोहचतील असा सवाल मोदींनी या खासदारांना विचारला आहे.
खासदारांनी या योजनांची माहिती घेऊन लोकांना द्यावी आणि कामात सुधारणा करावी असा सल्ला पंतप्रधानांनी दिलाय. २०१९ निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचनाही मोदींनी या खासदारांना केल्यात. अर्थसंकल्प आणि जाहीरनाम्यामधील आश्वासनं पूर्ण करण्याचा सल्लाही मोदींनी दिला आहे