कोटा : भावा-बहिणीने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून ९६ हजार ५०० रूपयांच्या जुन्या नोटा बदलवण्याची विनंती केली आहे. राजस्थानच्या कोटा शहरातील एका अनाथाश्रमात हे भाऊ बहिण राहतात.
हे पैसे त्यांच्या वडिलोपार्जित घरात महिन्याच्या सुरूवातीला सापडले आहेत. पण आता नोटा बदलवण्यासाठी कोणताच मार्ग त्यांच्याकडे नाही, म्हणून या दोघांनी पंतप्रधानांकडे नोटाबदलण्यास मदत करण्याची मागणी केली आहे.
बॅंकामध्ये जुन्या नोटा बदलण्याची मुदत संपली आहे. या अनाथ भाऊ-बहिणींमध्ये भाऊ १६ वर्षाचा तर बहिण १२ वर्षाची आहे.
रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने नोटा बदलवण्यासाठी नकार दिल्यानंतर त्यांनी मोदींना विनंती केल्याचं कोटा येथील बाल कल्याण समिति चे अध्यक्ष हरीश गुरुबख्शानी यांनी सांगितलं. त्यांच्या आईने आयुष्यभर हे पैसे सांभाळून ठेवले होते. भावाला हे पैसे बहिणीच्या नावे एफडी करायचे आहेत.
या मुलांची आई पूजा बंजारा ही मजदूर होती. २०१३ मध्ये त्यांचा खून झाला होता. तर वडील राजू बंजारा यांचा आधीच मृत्यू झालेला आहे. आईच्या मृत्यूनंतर दोघंही एका अनाथाश्रमात राहतात.
काही दिवसांपूर्वी एका समुपदेशन कार्यक्रमात या मुलांनी सरवदा गाव आणि आरके पुरम परिसरात वडिलोपार्जित घर असल्याचं सांगितलं. त्यानंतर या महिन्याच्या सुरूवातीला सीडब्ल्यूसीच्या निर्देशानुसार सरवदा येथील घराची झडती घेतली, तेव्हा तेथे एका बॉक्समध्ये काही दागिने आणि ९६ हजार ५०० रूपये सापडले.
सीडब्ल्यूसीने १७ मार्चला रिझर्व बॅंक ऑफ इंडियाला एक पत्र लिहून नोटा बदलण्याची विनंती केली होती, मात्र, २२ मार्चला बॅंकेने ई-मेल करून जुन्या नोटा बदलण्याची मुदत संपली असल्याने नोटा बदलता येणार नसल्याचं सांगितलं.