www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा पंचायतीचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. या पंचायतीने मुलींना जीन्स पॅंट घालण्याबाबत फतवा काढला आहे. मुलींनो जीन्स पॅंट घालू नका, असा फतवा आहे.
उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यामध्ये भरविण्यात आलेल्या एका महापंचायतीने मुलींनी जीन्सची पॅंट घालू नये, असा फतवाच काढलाय. उत्तर प्रदेश, हरियाना आणि राजस्थानमधील यादव जमातीच्या या महापंचायतीने दोन दिवसांपूर्वी हा फतवा काढला आहे. या महापंचायतीस ५२ गावांमधील हजारो नागरिक उपस्थित होते. महापंचायतीच्या या फतव्यावर येथील काही नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
या नव्या फतव्याची माहिती, बरसाणा येथील पुरोहित राम प्रसाद यांनी दिली. हा महापंचायतीचा निर्णय अतार्किक आहे. मुलींनी कोणता पोशाख करायचा आहे, हा निर्णय स्वत: त्यांनीच घ्यावयास हवा, अशी प्रतिक्रिया काही शिक्षकांनी व्यक्त केलीय.
तर दुरसरीकडे या महापंचायतीने घेतलेल्या इतर निर्णयांचे मात्र स्वागत करण्यात आले. दारू, हुंडा आणि समाज घातक प्रथांना महापंचायतीचा विरोध असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. जर मुलींना पंचायतीचा निर्णय अमलात आणला नाही तर जबर दंड भरावा लागेल, असा इशाराही या वेळी देण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.