`पंतप्रधानांच्या पाठिशी पक्ष`... सोनियांचं मोदींना सडेतोड उत्तर

दोषी लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणाऱ्या अध्यादेशावर राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर तीसऱ्या दिवशी क्राँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संपूर्ण काँग्रेस पक्ष पंतप्रधानांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचं स्पष्ट केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 1, 2013, 09:18 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मांड्या (कर्नाटक)
दोषी लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणाऱ्या अध्यादेशावर राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर तीसऱ्या दिवशी क्राँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संपूर्ण काँग्रेस पक्ष पंतप्रधानांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचं स्पष्ट केलंय.
सोनिया गांधींना हे स्पष्ट करावं लागलंय, कारण राहुल गांधी यांनी दोषी लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणारा अध्यादेश ‘पूर्णत: बकवास’ असल्याचं सांगत त्याला ‘फाडून फेकून द्यायला हवं’ असं म्हटल्यानंतर भाजपनं राहुलच्या या वक्तव्याला एक राजकीय खेळी असं नाव दिलं होतं. राहुल गांधींच्या या वक्तव्याला मुद्दा बनवत ‘राहुलचा हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर मात करण्याचा एक प्रयत्न आहे आणि तोही अशा वेळेस ज्यावेळी पंतप्रधान विदेश दौऱ्यावर आहेत’ असं म्हणत हा काँग्रेसचा अंतर्गत डावपेच असल्याचं म्हटलं होतं.
यावर भाजपला उत्तर देताना सोनिया गांधी यांनी एका जाहीर सभेत मनमोहन सिंग यांचा जोरदार बचाव केलाय. ‘मी त्यांना (भाजपला) सांगू इच्छिते की आमचा पूर्ण पक्ष पंतप्रधानांच्या पाठिशी उभा आहे. ते आम्ही उपलब्ध केलेल्या योजनांची खिल्ली उडवतात. ते आमच्या पक्षाचा आणि पंतप्रधानांचीही खिल्ली उडवतात. पण, मी त्यांना सांगू इच्छिते की सरकारनं ज्या काही सुविधा निर्माण केल्यात त्या सिंह यांच्या नेतृत्वाखालीच...’ असं म्हणत सोनिया गांधी यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
सोबतच, ‘आम्ही भाजपला घाबरत नाही... आम्ही इतर कोणत्याच विरोधी पक्षाला घाबरत नाही. आम्ही त्यांनी केलेल्या टीकेलाही घाबरत नाही. आम्ही आमच्या रस्त्यावर चालतच आमचे प्रामाणिक प्रयत्न करत राहणार’… असं म्हणतानाच त्यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. भाजपमध्ये लोकांना एकमेकांपासून तोडलं जातं... पम, काँग्रेस लोकांना एकत्र जोडण्याचं काम करतं, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला हाणला.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर टीका करत त्यांनी अध्यादेशावर टीका करून पंतप्रधान विदेश दौऱ्यावर असताना त्यांना अपमानित करण्याचं ‘पाप’ केल्याचं म्हटलं होतं. ‘पंतप्रधानांची किंमत त्यांचाच पक्ष कमी करतोय. काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी पंतप्रधानांचा अपमान करण्याचं पाप केलंय. सरकारच्या आतमध्येही वेगळी सरकार आहेत ज्यामुळे देशाच्या विकासावर परिणाम होतोय. देशाचा कारभार संविधानानुसार चालेल की शहजाद्याच्या मर्जीनुसार याचा निर्णय तुम्हीच घ्या...’ असं नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर भाषणात म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.