नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ एप्रिल 2017 पासून महत्त्वाकांक्षी जीएसटीची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवत सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिलेत. या तारखेपूर्वी जीएसटीसंबंधी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत खबरदारी घेण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली.
जीएसटी कायद्याची अंमलबजावणी आणि दरांबाबत वेळोवेळी शिफारशी देण्यासाठी जीएसटी परिषदेच्या सातत्याने बैठकी घेतल्या जाव्या, असेही त्यांनी सुचविलं. जीएसटीच्या अंमलबजावणीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी बुधवारी घेतलेल्या बैठकीत याबाबत आदेश दिले.
1 एप्रिल 2017 रोजी जीएसटीची अंमलबजावणी होण्याबाबत कोणतीही हयगय नको याची खातरजमा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली, पंतप्रधान कार्यालय आणि अर्थ मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.