केदारनाथ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी या दौऱ्याची सुरुवात केदारनाथाच्या दर्शनानं केली आहे.
आज सहा महिन्यानंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले करण्यात आले. यावेळी प्रथम दर्शन आणि रुद्रअभिषेकाचा मान पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला. दरवर्षी उन्हाळाच्या दिवसात केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात येतात. दरवर्षी हा दरवाजे उघडण्याचा कार्यक्रम एक मोठा सोहळा असतो. पण तीन वर्षांपूर्वी आलेल्या महापूरानंतर भाविकांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. आज तीन वर्षानंतर पुन्हा एकदा केदारनाथाचे दरवाजे उघडण्याचा मोठा सोहळा आयोजित करण्यात आला. त्या सोहळ्यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.
बुधवारी सकाळी दिल्लीहून ८.३० वाजल्याच्या दरम्यान केदारनाथ धाममध्ये दाखल झाले. थोड्या वेळ विश्राम करत ते केदारनाथ मंदिरात दाखल झाले. महत्त्वाचं म्हणजे, आजच केदारनाथाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत... आणि दरवाजे उघडल्यानंतर केदारनाथाचं दर्शन घेणारे पंतप्रधान मोदी हे पहिलेच व्यक्ती ठरलेत. केदारनाथ मंदिरात मोदींनी रुद्राभिषेकही केलाय. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी केदारनाथ मंदिरात दाखल झालेत.
केदारनाथ मंदिरातील पूजेनंतर पंतप्रधान हरीद्वार येथील पतंजली योगपीठातल्या रिसर्च इंस्टीट्यूटचं उद्घाटन करतील. पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे या दौऱ्याबद्दल बद्दल माहिती दिलीय.
उत्तराखंडमध्ये भाजप सरकारच्या शपथविधीनंतरचा पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे. मोदींनंतर याच आठवड्यात ५ मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हेदेखील उत्तराखंडचा दौरा करणार आहेत. या दरम्यान तेही केदारनाथ आणि बद्रीनाथला जाणार आहेत.