पोलिसाने पतीला डांबले, विवाहितेवर केला बलात्कार

रक्षकच जेव्हा भक्षक होतात तेव्हा दाद तरी कोणाकडे मागायची? महिलांवर वाढणारे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.

Rohit Gole Rohit Gole | Updated: Aug 19, 2012, 04:46 PM IST

www.24taas.com, अंजार
रक्षकच जेव्हा भक्षक होतात तेव्हा दाद तरी कोणाकडे मागायची? महिलांवर वाढणारे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. असाच काहीसा प्रकार गुजरातमधील अंजार भागात घडली आहे. पतीला जेलमध्ये डांबून पोलीस कर्मचाऱ्याने विवाहित महिलेवर बलात्कार केला.
पिडीत महिला पतिसोबत गुजरातमधील शामलाजी येथून अंजार बस स्‍थानकावर पोहोचली होती. बस स्‍थानकाबाहेर पडताना आरोपी पोलिसाने दोघांना तपासणीच्‍या बहाण्‍याने थांबविले. चौकशी करुन त्‍याने तिच्‍या पतिला पोलीस ठाण्‍यात लॉकअपमध्‍ये बंद केले. त्‍यानंतर बस स्‍थानकावर परतून पिडीतेला एका कारमध्‍ये घेऊन गेला आणि तिच्‍यावर बलात्‍कार केला. त्‍यानंतर तिला तो ठाण्‍यात घेऊन आला आणि पतिसोबत तिला पळून जाण्‍यास सांगितले.
या महिलेने पोलिस ठाण्‍यात उपस्थित असलेल्‍या इतर पोलीस कर्मचा-यांना घटना सांगितले. परंतु, त्‍यांनी तिची दखल घेतली नाही. उलट तिला तिच्‍या पतिसोबत ऑटोमध्‍ये बसवून रवाना केले. या दोघांनी त्‍यांच्‍या कंपनीच्‍या मालकाला घडलेला प्रकार सांगितला. त्‍यानंतर पोलिसांवर दबाव वाढला. अखेर आरोपी पोलिस कर्मचा-यावर अंजार पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल करण्‍यात आली. काल रात्री उशीरा त्‍याला अटक करण्‍यात आली. अंजार विभागाचे एसएसपी विरेंद्र यादव यांनी घटनेला दुजोरा दिला आहे.