मुंबई : आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन हे पुढची टर्म स्विकारणार नाहीत. खुद्द रघुराम राजन यांनीच हे जाहीर केलं आहे. ४ सप्टेंबर २०१६ ला रघुराम राजन यांचा कार्यकाळ संपणार आहे. यानंतर आपण अॅकेडमियाला परत जाणार असल्याचं राजन म्हणाले आहेत.
मी दुसरी टर्म स्वीकारत नसलो तरी जेव्हा गरज पडेल तेव्हा देशाची सेवा करीन अशी प्रतिक्रिया राजन यांनी दिली आहे. माझ्यानंतर या जागेवर येणारी व्यक्ती नक्कीच देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
रघुराम राजन यांना दुसरी टर्म मिळणार का नाही याविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. या चर्चांना अखेर रघुराम राजन यांनीच पूर्णविराम दिला आहे. दरम्यान राजन हे भारत सरकारचे कर्मचारी आहेत. सेलिब्रेटी नाहीत, असा टोला भाजप नेते सुब्रम्हणम स्वामी यांनी लगावलाय. याआधीही अनेकवेळा स्वामी यांनी रघुराम राजन यांच्यावर सातत्यानं टीका केली होती.