राहुल गांधी रेल्वेने पंजाब दौऱ्यावर

पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पंजाब राज्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. राहुल गांधी हे रेल्वेगाडीमधून पंजाबला जात आहेत. 

Updated: Apr 28, 2015, 06:03 PM IST
राहुल गांधी रेल्वेने पंजाब दौऱ्यावर title=

नवी दिल्ली : पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पंजाब राज्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. राहुल गांधी हे रेल्वेगाडीमधून पंजाबला जात आहेत. 

यावेळी राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटलंय, 'राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मला मिळाली आहे. यामुळे मी स्वत: याची पाहणी करण्यासाठी चाललो आहे,' 

पंजाब राज्यामध्ये शेतीच्या प्रश्‍नावरुन तणावग्रस्त वातावरण असून, राज्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर गांधी हे पंजाबमधील खन्ना व गोबिंदगड या ठिकाणांना भेट देणार आहेत. 

सरकारकडून गव्हाची खरेदी करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे, असा आरोप पंजाबच्या शेतकऱ्यांनी केला आहे. राज्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्याने अन्नधान्य बाजारामधील परिस्थिती गंभीर झाल्याचे मानण्यात येत आहे. खन्ना येथील धान्यबाजार हा आशिया खंडामधील सर्वांत मोठ्या बाजारांपैकी एक मानण्यात येतो. 

पंजाबमधील सरकार हे शेतकऱ्यांकडून पुरेशा प्रमाणात धान्य विकत घेत नसल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करुन सरकार उद्योगपती आणि श्रीमंतांना झुकते माप देत असल्याची टीका या पार्श्‍वभूमीवर बादल यांनी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर गांधी यांच्या पंजाब दौऱ्यास अत्यंत महत्त्व आले आहे. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी आता पंतप्रधान कार्यालयासमोर आपल्या मंत्र्यांसमवेत धरणे धरावे, असा खोचक सल्ला कॉंग्रेसचे राज्यामधील नेते अमरिंदर सिंग यांनी बादल यांना दिला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.