www.24taas.com, जामनगर
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी गुजरातच्या कुरुक्षेत्रात उतरलेत. गुजरात एक व्यक्ती चालवत नाही या शब्दात मोदींच्या गडावर जाऊन त्यांनी मोदींवर हल्लाबोल केलाय.. तसंच विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही राहुल यांनी केलाय.. शिवाय लोकायुक्तांची नियुक्ती गुजरातमध्ये अद्याप का नाही झाली असा सवाल राहुल गांधींनी विचारलाय. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज थंडावतोय.
गुजरात निवडणुकांचा प्रचार थंडावत असतानाच राहुल गांधी यांनी मात्र वातावरण तापवलंय. गुजरात राज्य प्रगतीपथावर आहे, हा प्रचार खोटा आहे, असं राहुल गांधींचं म्हणणं आहे. गुजरातमध्ये भ्रष्टाचार बोकळलाय. पाण्याची समस्या असून दर तीन दिवसांतून २५ मिनिटंच पाणी येतं. येथील १० लाख तरुण बेरोजगार आहेत. अशा परिस्थितीत गुजरात शायनिंगचा खोटा प्रचार गुजरातमधील ‘सौदेबाज नेते’ करत असल्याचे आरोप राहुल गांधींनी केला आहे.
गुजरातमध्ये गरीबांचा आणि विरोधकांचा आवाज दाबला जातोय. वर्षातून २५ दिवसच विधिमंडळाचं कामकाज चालतंय. गुजरातमध्ये मनमानी कारभार चालू आहे. हे गुजरात आम आदमीचं आहे. कुणी एक माणूस कसं काय हे स्वतःच्या मर्जीने चालवू शकतो? असा सवालही राहुल गांधींनी केला आहे.