कोण खोटं बोलतंय? बालक की बालकल्याण मंत्री ?

दिल्लीत सत्ता हातात आल्यानंतर आपचे आमदार आणि मंत्री नको ते पराक्रम करत असल्याचं दिसून येत आहे. दिल्ली सरकारमध्ये सर्वात कमी वयात मंत्रीपद मिळालेल्या महिला आणि बालकल्याण मंत्री राखी बिर्ला यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप होत आहे.

Updated: Jan 6, 2014, 03:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत सत्ता हातात आल्यानंतर आपचे आमदार आणि मंत्री नको ते पराक्रम करत असल्याचं दिसून येत आहे. दिल्ली सरकारमध्ये सर्वात कमी वयात मंत्रीपद मिळालेल्या महिला आणि बालकल्याण मंत्री राखी बिर्ला यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप होत आहे.
या बालविकास मंत्र्यांचा खोटारडेपणा एका बालकाने समोर आणला, असं तरी सध्याच्या परिस्थितीवरून म्हणता येईल.
राखी बिर्ला यांनी आपल्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याचा आरोप केला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत वेगळाच प्रकार समोर आला आहे, यावरून राखी बिर्ला सारख्या मंत्र्यांवर सामान्य जनतेचे किती विश्वास ठेवावा, असा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.
राखी बिर्ला यांनी आपल्या गाडीची काच फुटल्याची तक्रार केली होती. मात्र ही काच कुणीही हल्ला करण्याच्या उद्देशाने नाही, तर गल्लीत क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने लगावलेल्या जोरदार बॉलने राखी बिर्लांच्या गाडीची काच फुटली होती.
घडलेल्या प्रकारानंतर राखीची या मुलाने आणि त्याच्या वडिलांनी माफी मागितली होती. तरीही आपच्या मंत्री राखी बिर्ला यांनी आपल्या गाडीवर हल्ला झाल्याचा संशय असल्याचं म्हटलं होतं.
या प्रकारामुळे फक्त राखी बिर्ला यांची प्रतिमा सर्व सामान्यांच्या नजरेत मलीन झाली असं नाही, तर आप पक्षाचीही प्रतिमा डागाळली आहे. यामुळे राखी बिर्ला यावर काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.