नवी दिल्ली : येत्या बुधवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल देशातल्या कर्जदारांना दिलासा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात कमी झालेला महागाईचा दर आणि अर्थमंत्र्यांनी वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा केलेला संकल्प या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक व्याजाच्या दरात पाव टक्के कपात करण्याची शक्यताय.
येत्या बुधवारी म्हणजे आठ तारखेला रिझर्व्ह बँक पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहे. देशातल्या बहुतांश अर्थतज्ज्ञांच्या मते यावेळी रेपो दरात पाव टक्क्याची कपात करणं रिझर्व्ह बँकेला शक्य आहे. देशाच्या आर्थिक विकासाला बसलेली खीळ हटवण्यासाठी कर्जाचे व्याजदर कमी करण्याची गरज आहे.
अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सरकारी गुंतवणूकीला चालना देण्याचं सुतोवाच केलं आहे. त्यात खाजगी गुंतवणूक वाढली तर विकासाला आणखी भर पडणार आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाकडे उद्योग क्षेत्राचे डोळे लागून आहेत.
शिवाय आयकरातून सवलत मिळाल्यावर गृहकर्जाच्या व्याजदरातही आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच कपात झाली, तर सामान्य गृहकर्जदारांनाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यताय.