नवी दिल्ली : भारत चीन सीमेवर अगदी भारतीय सीमेपर्यंत चीनचे रेल्वेमार्ग आले आहेत. भारतासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. मात्र, आता भारतानेही त्याला तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी सुरू केलीय. चीन सीमेपर्यंत भारत रेल्वेमार्ग टाकणार आहे.
अरूणाचल प्रदेशातल्या चीनी सीमेपर्यंत आलेल्या चिनी रेल्वेनं तिबेटातही आपलं जाळं पसरलंय. यामुळेच चीन अरूणाचल प्रदेशावर आपला दावा प्रबळ करतोय. मात्र, चीनकडून भारताने उशीरा का होईन शहाणपण शिकलंय. चीनी सीमेला लागून असलेल्या प्रदेशात चार रेल्वेमार्ग भारत टाकणार आहे. राजनैतिकदृष्ट्या भारताने उचललेलं हे पाऊल महत्त्वाचं आहे.
भारतीय रेल्वेमार्गाची वैशिष्ट्ये...
- हे रेल्वेमार्ग अरूणाचल प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमध्ये असतील.
- एकूण १४०० किलोमीटरचे हे मार्ग असतील.
- पहिली रेल्वेलाईन अरूणाचल प्रदेशातल्या मिसीमारी ते तवांग दरम्यान ३७८ किलोमीटरचं अंतर पार करेल
- दुसरी लाईन उत्तर लखीमपूरपासून सिलापथरपर्यंत २४८ किलोमीटरचं अंतर पार करेल
- तिसरा मार्ग मुरकोंगसेलेक- पासीघाट- तेजू- परशूराम कुंड- रूपई दरम्यान २५६ किलोमीटर तर हिमाचल प्रदेश- जम्मू काश्मीरमध्ये बिलासपूर- मंडी- मनाली- लेह दरम्यान ४९८ किलोमीटरचं अंतर पार करेल.
- या मार्गांच्या सर्वेचं काम सुरू झालंय. सर्व्हेवरच तब्बल २०० कोटींचा खर्च होणार आहे. सर्वे पूर्ण व्हायला दोन वर्ष लागतील.
रेल्वे मार्गांच्या निर्माणाचं कार्य जलद होण्यासाठी अरूणाचल प्रदेशात सीमेपर्यंत रस्ते तयार करण्याच्या कामाला सरकारने वेग दिलाय. रेल्वे आणि रस्ते, दोन्ही मार्गांनी मजबूत होणं गरजेचं आहे, असं निवृत्त ब्रिगेडीअर अरूण सेहगल यांचं म्हणणं आहे.
चीनच्या सीमेपर्यंत रेल्वे मार्ग नेणं हे भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. कारण तिबेटमध्ये पसरलेल्या रेल्वे जाळ्यामुळे चेंगडूपासून अवघ्या ४८ तासांत चिनी आर्मी २१०० किलोमीटरचं अंतर पार करून भारत सीमेवर पोहोचेल. चिनी शहर युनान ते तिबेट दरम्यान रेल्वे आणि रस्ते मार्गाचं निर्माण होत आहे. भारताला घेरण्यासाठी चिनी रेल्वेमार्ग काराकोरम खिंड पार करून थेट पाकिस्तानात पोहोचले आहेत.
भारताची ही खेळी म्हणजे उशीरा सुचलेलं शहाणपण असलं तरीही महत्त्वाचं आहे. चिनी ड्रॅगनवर अंकूश ठेवायचा असेल तर सीमेपर्यंत दळणवळणाची साधनं मजबूत हवीतच.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.