महिलांना सलग ७३० दिवस विनाखंड सुट्टीचा हक्क!

कोणतीही केंद्रीय सरकारी नोकरदार महिला आपल्या सेवाकाळात आपल्या मुलांच्या संगोपणासाठी, मग ते परिक्षेसाठी असो किंवा आजारपणासाठी... सलग दोन वर्षांची सुट्टी घेऊ शकते, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 16, 2014, 12:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कोणतीही केंद्रीय सरकारी नोकरदार महिला आपल्या सेवाकाळात आपल्या मुलांच्या संगोपणासाठी, मग ते परिक्षेसाठी असो किंवा आजारपणासाठी... सलग दोन वर्षांची सुट्टी घेऊ शकते, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.
न्यायमूर्ती एस जे मुखोपाध्याय आणि व्ही गोपाला गौडा यांनी सहाव्या वेतन आयोगातील तरतुदीवर शिक्कामोर्तब केलंय. काकाली घोष यांना सरकारने अशी सुट्टी नाकारल्याने त्यांनी आधी कोलकाता लवादाकडे तक्रार केली. येथील निकाल त्यांच्या बाजूने लागल्याने त्याला आव्हान देण्यात आले. हायकोर्टाने घोष यांच्याविरोधात निकाल लागल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मंगळवारी कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, मुलांच्या परीक्षा, आजारपण यांसारख्या कारणांसाठी १८ वर्षांखालील मुले असणाऱ्या सरकारी नोकरदार महिलांना दोन वर्षांपर्यंत सुट्टी घेऊ शकतात. या सुट्ट्या सरकारी नोकरदार महिला ७३० दिवस विनाखंड घेऊ शकतात, असंही कोर्टानं स्पष्ट केलंय.
`नियम ४३-सी`नुसार १८ वर्षांखालील मुले असलेल्या सरकारी नोकरदार महिलांना ७३० दिवसांची `चाइल्ड केअर लिव्ह` घेता येते. दोन मुलांच्या संगोपनासाठी नोकरी सुरू असताना कोणत्याही कारणानिमित्त घेण्याची अनुमती आहे तसेच ७३० दिवसांनंतर इतर सुट्ट्यांपैकी कोणती सुट्टी शिल्लक असल्यास तीही जोडून घेऊ शकतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.