नवी दिल्ली : केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित यांनीही आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सुपूर्द केला. मी कालच राज्यपालपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी राजीनामा दिला होता.
मला यासंदर्भात आणखी काही बोलायचे नाही, असे शीला दीक्षित यांनी पत्रकारांना सांगितले. यावर्षी मार्चमध्येच त्यांची यूपीए सरकारकडून केरळच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
केंद्रामध्ये सत्तापालट झाल्यानंतर राजीनामा देणाऱया शीला दीक्षित सातव्या राज्यपाल आहेत. त्यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच त्यांनी राष्ट्रपतींकडे जाऊन आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.
शीला दीक्षित यांना केरळमधून मिझोरामला हलविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला.
याआधी एम. के. नारायणन - पश्चिम बंगाल, बी. एल. जोशी - उत्तर प्रदेश , शेखर दत्त - छत्तीसगढ , बी. व्ही. वांछू - गोवा, के. शंकरनारायणन - महाराष्ट्र, अश्वनीकुमार - नागालॅंड यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.