नवी दिल्ली : भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट आता आपल्याच पक्षातील नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर हल्लाबोल चढवलाय. त्यांना 'वेटर'ची उपमा दिली.
स्वामी यांनी जेटलींवर जोरदार शाब्दिक वार सुरु केलेत. अरुण जेटली गुरुवारी बँक ऑफ चायनाचे अध्यक्ष तिआन गिली यांना बीजिंगमध्ये भेटले. त्यांचे सूट आणि टायमधील छायाचित्र वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होताच स्वामींनी अरुण जेटलींना टार्गेट केले आहे.
टाय आणि सूट घातलेले नेते वेटरसारखे दिसतात असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. त्यामुळे भाजप नेत्यांनी आणि मंत्र्यांनी विदेशात जाताना भारतीय पेहरावात जावे, असा सल्लाही त्यांनी जेटलींना दिलाय. सुब्रमण्यम स्वामी हे सध्या मोदी आणि अमित शाह वगळता कोणालाच जुमानत नसून त्यांनी उघडपणे जेटलींवर टीका केल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.
त्याआधी जेटली यांनी रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावरही हल्लाबोल चढवला होता. त्यांच्यामुळे देशाचे नुकसान झाल्याची खुलेआम टीका केली होती. त्यावेळी जेटली यांनी स्वामींना सल्ला दिला होता. आपण शहा आणि मोदी यांचेच ऐकतो, बाकीचे शून्य अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.