एका चहावाल्यानं शिकवला भारतातल्या सर्वांत मोठ्या बँकेला धडा!

'नेव्हर अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन'... हे वाक्य खरं करून दाखवलंय भोपालमध्ये राहणाऱ्या राजेश साक्रे या चहा विक्रेत्यानं...

Updated: Jun 24, 2015, 02:48 PM IST
एका चहावाल्यानं शिकवला भारतातल्या सर्वांत मोठ्या बँकेला धडा! title=

भोपाळ : 'नेव्हर अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन'... हे वाक्य खरं करून दाखवलंय भोपालमध्ये राहणाऱ्या राजेश साक्रे या चहा विक्रेत्यानं...

भारतातील सर्वांत मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI)विरुद्ध राजेशनं २०११ एक दावा दाखल केला होता... हाच दावा कोणत्याही वकिलाशिवाय राजेशनं जिंकून बँकेलाही चांगलाच धडा शिकवलाय.

२०११ साली राजेश साक्रे यांच्या खात्यात जमा असलेल्या २०,००० रूपयांपैकी फक्त त्यांनी १०,८०० रुपये काढले होते. यानंतर जेव्हा राजेश पुन्हा एटीएममध्ये गेले तेव्हा त्यांचं खातं साफ झालं होतं... खात्यात शिल्लक असलेले ९,२०० रुपये अचानक गायब झाले होते.

बँकेसाठी ही छोटी रक्कम असली राजेशसाठी मात्र ही मोठी रक्कम होती. बँकेत विचारणा करायला गेलेल्या राजेशला बँकेनं काही दाद दिली नाही. त्यानंतर त्यांनी बँकेच्या मुंबई मुख्यालयात दाद मागितली पण इथंही त्यांच्या पदरी निराशाच पडली. 

शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली. कोर्टात आपल्या वतीनं केस लढण्यासाठी एखादा वकील उभा करण्याचीही परिस्थिती राजेशची नव्हती. 

त्यामुळे, कोर्टात बँकेच्या वकिलांना सडेतोड उत्तरं देण्यसाठीही राजेशच उभा राहिला. साक्रे यांनीच हे पैसे काढल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला. परंतु सीसीटीव्ही फुटेज किंवा कोणताही दुसरा पुरावा देण्यात बँक अपयशी ठरली... 

आणि १६ जूनला ग्राहक मंचाने साक्रेंच्या बाजूने निकाल देत बँकेला साक्रे यांचे गायब झालेले ९,२०० रुपये ६ टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश तर दिलेच सोबत साक्रे यांना १०,००० रुपये नुकसान भरपाई आणि २००० रुपये कायदेशीर खर्च देण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.