www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपालांवर फास आवळण्यास सुरूवात झालीय. गोवा पोलिसांच्या टीमने नवी दिल्लीत चौकशीला कालपासून सुरूवात केलीय. आज तरूण तेजपाल यांना चौकशीसाठी बोलावणं पाठवलं जाण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी गोवा पोलिसांनी तहलकाच्या मॅनेजिंग एडीटर शोमा यांची नऊ तास चौकशी केली. तसंच तहलका कार्यालयाचे कम्प्युटर्स आणि सीपीयूसह अनेक महत्त्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आलेत. गोवा पोलीसांनी आज पीडित तरुणीच्या इमेलमध्ये उल्लेख असलेल्या तीन पत्रकार मित्रांचीही चौकशी केलीय. लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर लगेचच पीडित तरुणीनं या आपल्या मित्रांना या घटनेबद्दल कळवलं होतं. तसंच मुलीनं याबद्दल तहलकाच्या मॅनेजिंग एडिटर शोमा चौधरी यांनाही याबाबत सांगितलं होतं. त्यामुळे शोमा चौधरी यांची आजही चौकशी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत पीडित तरुणीची माफी मागणा-या तेजपालांनी आपली भूमिका बदललीये. जे काही झालं त्यासाठी तरुणीची सहमती असल्याचं तरुण तेजपाल यांनी म्हटलं असून हे आपल्याविरोधात कट असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे पीडित तरुणीने तेजपाल यांच्यावर आणखी एक आरोप केल्याचं उघड झालंय. पीडित तरुणिच्या कुटुंबाला तेजपाल यांच्या घरातील काही सदस्यांनी तक्रार मागे घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप आता पीडित तरुणीने केलाय.
तेजपालविरुद्ध या प्रकरणात प्राथमिक गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. पणजीमध्ये गोवा पोलिसांचे डीआयजी ओ.पी.मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी महिलेचं कथित स्वरुपात विनयभंग करण्यात आला, त्या हॉटेलच्या लिफ्टमध्ये कोणताच सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. याप्रकरणात पोलिसांची अधिक चौकशी सुरू आहे. अतरिक्त पोलीस आयुक्त (अपराध) रवींद्र यादव यांच्यासाहीत दिल्ली पोलिसांची एक टीमही चौकशीदरम्यान गोवा पोलिसांच्या मदतीसाठी तहलकाच्या कार्यालयात उपस्थित होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.