सागर कुलकर्णी, मुंबई : ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मोदी सरकारनं तडकाफडकी घेतला. करोडो भाविकांची श्रद्धास्थानं असलेल्या देवस्थानांच्या अर्थकारणावर याचा नेमका काय परिणाम होतोय, पाहुयात...
'पैसा भगवान तो नही... लेकीन भगवान से कम भी नही...' असं म्हणतात. परंतु मोदी सरकारच्या नव्या निर्णयामुळं या देवाची आणि देवस्थानांचीदेखील सॉलिड काशी झालीय.
प्रभादेवीचं सिद्धीविनायक मंदिर, शिर्डीचं साईबाबा संस्थान, नाशिकजवळचं त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि कोल्हापूरचं श्री महालक्ष्मी मंदिर... तिथल्या दानपेटीत दररोज करोडो रूपयांचं दान भक्तांकडून जमा होतं. मात्र ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा सरकारनं बाद केल्यानं, या देवस्थानांचं अर्थकारणही बदलून जाणार आहे.
सिद्धीविनायक मंदिरात ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा स्वीकारणं बंद करण्यात आलंय. या नोटांचं दान दिल्यास पावती मिळत नाही. मात्र, दानपेटीत कितीही रक्कमेच्या नोटा टाकता येतील, असं सिद्धीविनायक मंदिर व्यवस्थापनानं स्पष्ट केलंय.
शिर्डीच्या साई मंदिरात दर चार दिवसांनी दानपेटीतील रक्कमेची मोजणी होते. सुमारे सव्वा कोटी रूपयांची रक्कम त्यात असते. उत्सव आणि सुट्टीच्या काळात ही रक्कम चार कोटींच्या घरातही जाते. त्यामध्ये ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांचं प्रमाण सर्वाधिक असतं. मात्र आता या नोटा चलनातून हद्दपार झाल्यानं शिर्डीचं अर्थकारण बदलत जाणार आहे.
सरकारनं अचानक घेतलेल्या या निर्णयाचा त्रास धार्मिक पर्यटनासाठी आलेल्या भक्तांनाही होतोय. जवळ सुटे पैसे नसल्यानं त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय.
महाराष्ट्रातल्या अन्य बड्या देवस्थानांमध्येही कमी अधिक फरकानं हेच चित्र दिसतंय. अनेकांनी घरात लपवून ठेवलेला काळा पैसा सरकारच्या नव्या निर्णयामुळं वायाच जाणार आहे. हाच पैसा देवाच्या दानपेटीत टाकून निदान काही अंशी पुण्य कमावण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. त्यामुळं नजिकच्या भविष्यात दानपेट्या काळ्या पैशांनी भरून जाण्याची शक्यताही आहे.