राष्ट्रवादीची ‘टिकटिक’ केवळ महाराष्ट्रातच वाजणार!

राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शरद पवारांच्या घड्याळाची टिकटिक केवळ राज्यापूरतीच राहू शकते.

Updated: Jun 30, 2014, 02:09 PM IST
राष्ट्रवादीची ‘टिकटिक’ केवळ महाराष्ट्रातच वाजणार! title=

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शरद पवारांच्या घड्याळाची टिकटिक केवळ राज्यापूरतीच राहू शकते.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणेच बहुजन समाजवादी पक्ष तसंच भारतीय कम्युनिस्ट पार्टी म्हणजेच CPI या पक्षांची ही राष्ट्रीय मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत या तिन्ही पक्षांचा मोठा पराभव झाला होता. त्यानंतर या पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता का रद्द करु नये? अशी नोटीस निवडणूक आयोगानं बजावलीय.

आयोगाच्या या नोटीशीची मुदत 27 जूनलाच संपलीय. आता लवकरच हे तीन्ही पक्ष प्रादेशिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात भाजप, काँग्रेस आणि CPM हे तीनच राष्ट्रीय पक्ष म्हणून राहण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सहा, भाकपाला एक जागा मिळाली तर बसपाला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळंच हे पक्ष गोत्यात आले आहेत. निवडणूक आयोगानं एखाद्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा बहाल करण्यासाठी काही अटी निश्चित केलेल्या आहेत. त्यानुसार देशातील कोणत्याही चार राज्यांमध्ये कमीत कमी ६ टक्के मते वा लोकसभेच्या तीन चतुर्थांश जागांवर २ टक्के मतं मिळवण्याची आवश्यकता आहे. चार राज्यांमध्ये राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा असल्यासही राष्ट्रीय दर्जा अबाधित राहतो. या सर्वच निकशांमधून राष्ट्रवादी, बसपा आणि भाकप हे तिन्ही पक्ष लोकसभेतील मोठ्या पराभवामुळं बाद झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.