मुंबई: वादग्रस्त ललित मोदी यांच्यावरून राजकारण ढवळत असताना मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया हेही लंडन इथं जुलै २०१४ मध्ये ललित मोदींना भेटल्याची बाब उजेडात आल्यानं अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) भुवय्या उंचावल्या आहेत. ईडी ललित मोदी यांच्याविरुद्ध १६ गुन्ह्यांप्रकरणी चौकशी करीत असताना मारिया-ललित भेटीचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
या प्रकरणावर खुलासा करताना राकेश मारिया यांनी सांगितलं की, एका कॉन्फरन्ससाठी लंडनला गेलो असता मोदींचे वकील मला भेटले. लंडनमध्ये मोदी आणि त्यांच्या कुटुंबियाच्या जीवास धोका आहे, त्याअनुषंगानं ललित मोदी यांना तुम्हाला भेटायचे आहे, असं मोदींच्या वकिलानं सांगितलं. तेव्हा मी मोदी यांची भेटली घेतली. परंतु, अत्यंत थोड्या वेळासाठी असं मारिया यांनी सांगितलं.
लंडन हे काही मुंबई पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येत नाही. भारतात येऊन तक्रार दाखल करा, असं मी त्यांना सांगितलं. मुंबई पोलिसांना या प्रकरणी चौकशी करता यावी म्हणून मोदींनी मुंबईला परतणं जरुरी आहे, असं मी मोदी आणि त्यांच्या वकिलांना सांगितलं. आमची ही भेट अवघ्या १५ ते २० मिनिटांची होती, असं मारिया यांनी जारी केलेल्या निवेदनात नमूद केलंय.
लंडनहून मुंबईला परतल्यानंतर मी याबाबत तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही माहिती दिली असल्याचं मारिया यांनी सांगितलं. गुन्हे विभागाचा सह-आयुक्त असताना आम्ही ललित मोदींवर हल्ला करण्याचा मुंबई अंडरवर्ल्डचा डाव उधळून लावला होता, असंही मारिया यांनी स्पष्ट केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.