रायचूर, कर्नाटक : एक ट्रक रस्त्यात पलटी झाला... धक्कादायक म्हणजे, हा ट्रक जुन्या ५०० आणि १००० च्या नोटांनी खचाखच भरलेला होता.
'नवभारत टाईम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ही घठना सिंधानूर तालुक्यातील कुन्नातागी कॅम्पजवळ घडलीय. तब्बल नऊ ट्रक भरून जुन्या नोटा घेऊन जात होत्या. या सर्व ट्रकमध्ये चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा भरलेल्या होत्या. त्यातीलच एक ट्रक पलटी झाला आणि त्यातील नोटा बाहेर रस्त्यावर फेकल्या गेल्या.
या नोटा रद्दीच्या कागदांनी झाकण्यात आल्या होत्या. नोटा पाहिल्यानंतर आजुबाजुचे लोक रस्त्यावर जमा झाले... परंतु, या चलनातून रद्द झालेल्या नोटांनी उचलण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली मात्र दिसली नाही.
पोलिसांना सूचना मिळाल्यानंतर अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आणि त्यांनी या जुन्या नोटा ताब्यात घेतल्या. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्याची पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर काळं धन जमा करून ठेवणाऱ्या लोकांची या नोटा ठिकाण्यावर लावण्यासाठी एकच धांदल उडालीय.