तिरुपती देवस्थान ७.५ टन सोनं पीएम स्कीममध्ये देणार?

जगातील सर्वात समृद्ध आणि श्रीमंत मंदिर म्हणून ओळखलं जाणारं तिरुपती बालाजी संस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलंय. 

Updated: May 2, 2016, 09:29 PM IST
तिरुपती देवस्थान ७.५ टन सोनं पीएम स्कीममध्ये देणार? title=

तिरुपती : जगातील सर्वात समृद्ध आणि श्रीमंत मंदिर म्हणून ओळखलं जाणारं तिरुपती बालाजी संस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलंय. 

तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) आपल्याकडील जवळपास साडे सात टन सोनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्वर्ण मौद्रीकरण योजना (गोल्ड मोनेटायजेशन स्कीम)मध्ये देण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ही योजना पंतप्रधानांनी गेल्या वर्षी सुरू केली होती. 

एकूण ७.५ टन सोनं... 

टीटीडीनं सध्या या योजनेअंतर्गत आपल्याकडील केवळ १.३ टन सोनं पंजाब नॅशनल बँकेत जमा केलंय. देवस्थानाकडे आत्तापर्यंत ७.५ टन सोनं जमा झाल्याचं नुकतंच टीटीडीचे कार्यकारी अधिकारी डी. संबाशिव राव यांनी हैदराबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं. 

रोख नको, सोन्यात हवं व्याज

सरकारकडे आपण सध्याच्या नियमांत थोडे बदल करण्याची विनंती केलीय. व्याजाचा परतावा आपल्याला रोख न करता सोन्यातच करण्यात यावा अशी विनंती देवस्थानानं सरकारकडे केलीय.