गोव्यात दोन पर्यटक तरुणींवर अपहरणानंतर सामूहिक बलात्कार

पोलीस असल्याची बतावणी करत टॅक्सीचालकाला मारहाण करून, टॅक्सीसह दोन पर्यटक तरुणींचे अपहरण आणि बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गोव्यातल्या अंजुना परिसरात  घडलीय. 

Updated: Jun 4, 2015, 02:58 PM IST
गोव्यात दोन पर्यटक तरुणींवर अपहरणानंतर सामूहिक बलात्कार title=

पणजी : पोलीस असल्याची बतावणी करत टॅक्सीचालकाला मारहाण करून, टॅक्सीसह दोन पर्यटक तरुणींचे अपहरण आणि बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गोव्यातल्या अंजुना परिसरात  घडलीय. 

या प्रकरणी हणजुण पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत पाचही आरोपींना रात्री उशिरा अटक केली असून अपहरण झालेल्या तरुणींची त्यांच्या तावडीतून सुटका केली.  

अजय कुमार, जीवन पवार, नदीम खान, त्रेव्होर जोसेफ आणि कमलेश चौधरी अशी या  अटक केलेल्या पाच आरोपींची नावे असून त्यांच्यावर 342,170, 323, 324, 364 (अ) आणि 395 या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवोली येथील अभिजित कोचरेकर हा दिल्लीतील महिला पर्यटकांना घेऊन  कळंगुटच्या दिशेने जात होता. या टॅक्सीचा ५ युवकांनी ५ मोटरसायकलद्वारे पाठलाग केला व हडफडे येथे टॅक्सी थांबवली. आपण पोलिस असल्याचे सांगून तपासणी व चौकशी करण्याच्या नावाखाली दोन्ही युवती व कोचरेकर यांना मारहाण केली. 

टॅक्सी चालकाला धमकावून टॅक्सीत दोन्ही तरुणींना बसवले. त्यांच्यासोबत टॅक्सी कळंगुट येथे एका हॉटेलात घेऊन गेले. हॉटेलवर पोहोचताच कोचरेकर याला धमकावून त्याचे एटीम कार्ड व पिन कोड घेऊन संशयितांनी त्याच्या खात्यातील दहा हजार रुपये काढले. तसेच "तू आता जा आणि उद्या दीड लाख रुपये घेऊन ये. त्यानंतरच टॅक्सी आणि दोघी तरुणींना घेऊन जा', असे बजावले.

टॅक्सीचालक कोचरेकर घाबरून वाहन सोडून घरी आला. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपींनी कोचरेकर याला फोन करून पैशाची मागणी केली असता, तो आणखी घाबरला. शेवटी त्याने हणजूण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत, हणजूण, म्हापसा व कळंगुट पोलिसांनी संबंधीत हॉटेलातून ५ जणांना अटक केली. त्यानंतर दोन्ही पर्यटक तरुणींची सुटका केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.