नवी दिल्ली : एलओसीमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानी सीमेलगत सर्व राज्यांना हायअलर्टच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यातच मल्टी एजेंसी सेंटर (MAC) ने गुजरात आणि इतर राज्यांना सूचना दिली आहे की, पाकिस्तानातील कराची येथून निघालेली दोन संशयित बोट ही गुजरात आणि महाराष्ट्राच्या दिशेने निघाली आहे.
मल्टी एजेंसी सेंटरने या बोटबाबत माहिती दिली आहे. एका बोटमध्ये तांत्रिक अडचण आली पण दुसरी बोट ही चांगली आहे आणि ती भारताच्या दिशेने येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारतीय कोस्ट गार्ड सतर्क आहेत आणि रविवारी देखील ९ लोकांसह एका पाकिस्तानी बोटला ताब्यात घेण्यात आलं होतं. या लोकांची चौकशी सुरु असल्याचं बोललं जातंय. राज्यातील सुरक्षा यंत्रणांना देखील सूचित करण्यात आलं आहे की, दहशतवादी हे घुसखोरीचा प्रयत्न करु शकतात त्यामुळे कोणत्याही परिस्थितीशी लढण्यासाठी तयार राहा. गुजरातच्या समुद्र किनाऱ्यांवर देखील मोठ्य़ा प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार बीएसएफ जवान आणि नौसेना तसेच सीमाभागातील 22 चेकपोस्ट्संना अलर्ट करण्यात आलं आहे. घुसखोरीचा प्रयत्न रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली आहे.