www.24taas.com, झी मीडिया, छत्तीसगड
छत्तीसगडमध्ये काँग्रेस परिवर्तन रॅलीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी गुडसा उसेंडी या नक्षलवादी नेत्यानं स्वीकारलीय.
उसेंडी हा ‘दंडाकरण्य स्पेशल झोन’चा नक्षली नेता आहे. त्यानं पत्रक काढून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. या पत्रकात भाजप आणि काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका करण्यात आलीय. २५ तारखेला काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीवर भीषण नक्षली हल्ला झाला होता. या हल्ल्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्र कर्मा, माजी आमदार उदय मुदलीयार आणि प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांच्यासह २७ जणांचा बळी गेलाय तर या हल्ल्यात जखमी झालेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विद्याचरण शुक्ल यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.
२५ मे रोजी सुकमा भागात झालेल्या भीषण नक्षलवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या काँग्रेस नेत्यांना राजधानी नवी दिल्लीत भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी तसंच दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यावेळी उपस्थित होत्या. त्यांच्याबरोबर अनेक महत्त्वाचे काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते.
सामान्य नागरिक दूरच...
दरम्यान, छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा चंद्रपुरात सामाजिक संघटना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा आयोजित केला होता. मात्र तीन लाख लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर शहरातून अत्यल्प लोक रस्त्यावर उतरले. खरंतर अन्य भागात नक्षल समस्या दारावर उभी असली तरी चंद्रपूर-गडचिरोलीत या हिंसेनं जनजीवन ढवळून काढलंय. अशा स्थितीत विविध राजकीय पक्ष आणि सामान्य चंद्रपूरकरांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येणं गरजेचं होतं. मात्र, तसं न झाल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.