www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
योजना आयोगानं ग्रामीण भागात २८ रुपये तर शहरी भागात ३२ रुपये खर्च करू शकणाऱ्या व्यक्तींना गरिबी रेषेतून बाहेर काढलंय. यावरच स्पष्टीकरण देताना काँग्रेसचे प्रवक्ते, यांनी आणखी एक हास्यास्पद विधान केलंय.
राज बब्बर यांच्या म्हणण्यानुसार, ‘मुंबईत १२ रुपयांत पोटभर जेवणं करणं शक्य आहे’. बब्बर यांनी ‘एआयसीसी’वर स्पष्टीकरण देताना हे विधान केलंय. वस्तूंचा भाव वाढला असला तरी गरिबी कशी कमी झालीय, हे समजावून देण्याचा ते प्रयत्न करत होते.
योजना आयोगाच्या गरिबी सीमारेषेबाबात राज बब्बर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. एखाद्या व्यक्तीला केवळ २८ किंवा ३२ रुपयांत दोन वेळचं पोटभर अन्न तरी मिळू शकतं का? असा प्रश्न त्यांना विचारला गेला. यावर राज बब्बर उत्तर देताना म्हणाले, ‘लोकांना दिवसातून दोन वेळा तरी पोटभर अन्न मिळायला हवं... ते एवढ्याशा पैशांत कसं मिळवू शकतात? हा तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. मी सांगेल की मुंबईत आजही १२ रुपयांत पोटभर अन्न मिळू शकतं... मी वडापाव म्हणत नाहीए... तर भात, डाळ, सांबर आणि काही भाज्यांही या १२ रुपयांतच मिळू शकतात.’ यापुढे बब्बर यांनी ‘पण, ही काही चांगली गोष्ट आहे असं मी म्हणत नाहीए’ अशी स्पष्टीकरणही दिलं.
‘जर तुम्ही टोमॅटोच्या किंमतीवरून वाढलेल्या किंमतींचं आणि महागाईचं आकलनं करायला जाल तर ते चुकीचं ठरेल... कारण शहरांमध्ये तुम्हाला टोमॅटो खाणार नाहीत, ते महाग असू शकतात पण गावात मात्र लोक टोमॅटो पिकवतात, तोडतात आणि खातात... मग, आपण त्यांना गरीब म्हणणार की श्रीमंत’ असा प्रश्न विचारतानाच राज बब्बर यांनी ‘मी ही काही गरिबीची व्याख्या देतोय असं समजू नका’ असंही स्पष्ट करून टाकलं.
नेते आणि अभिनेते असलेल्या बब्बर यांचं हे विधान हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया भाजपानं व्यक्त केलीय. एका टीव्ही शो दरम्यान राज बब्बर यांनी उत्तर देताना भाजपच्या ललिता के. मंगलम यांनी काँग्रेस प्रवक्त्यांच्या या विधानाची टर उडवलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.