खडकपूर : बिहारमध्ये हिंदी माध्यमातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयआयटी खडकपूर येथून बीटेक(कम्प्युटर सायन्स) ची पदवी घेणाऱ्या इंजिनीयरला मायक्रोसॉफ्टने वर्षाला १.०२ कोटींच्या पॅकेज असेलल्या नोकरीची ऑफर दिलीय.
२१ वर्षाच्या वात्सल्य सिंह चौहान बिहारच्या खगडिया जिल्ह्यात राहतो. त्याचे वडिल वेल्डिंगचे काम करतात आणि घर चालवतात. त्याला पाच भाऊ-बहिणी आहेत. आर्थिक परिस्थीती चांगली नसतानाही त्याच्या वडिलांनी त्याला इंजिनीयरिंग परीक्षेच्या तयारीसाठी राजस्थानच्या कोटा येथे पाठवले होते.
वात्सल्य सुरुवातीपासूनच शिक्षणात हुशार होता. जेव्हा इंटरमिडीयट परीक्षेत त्याला ७५ टक्के मिळाले तेव्हा आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. घरात आर्थिक परिस्थिती बेताची मात्र त्यानंतरही त्याच्या वडिलांनी २०११ मध्ये कोटा येथे पाठवले. त्यानंतर आयआयटी खडकपूर येथे कम्प्युटर सायन्ससाठी त्याने प्रवेश घेतला.
इंजीनियरिंगची फी भरण्यासाठी त्याने साडेतीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. आता बीटेकचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळालीये. येथे त्याला वार्षिक १.०२ कोटी रुपयांचे पॅकेज ऑफर करण्यात आलेय. कठीण परिस्थितही मोठे यश मिळवणाऱ्या वात्सल्यची यशाची कहाणी नक्कीच इतरांना प्रेरणा देणारी ठरेल.