नवी दिल्ली : दिल्लीत घडलेल्या 'निर्भया बलात्कार' प्रकरणातील ४ दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. परंतु, याच प्रकरणातील दोषी असलेला परंतु, अल्पवयीन असल्याचा फायदा मिळालेला पाचवा अल्पवयीन आता कुठे आहे? सध्या तो काय करतो? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अल्पवयीन सध्या दक्षिण भारतातल्या एका रेस्टॉरन्टमध्ये काम करतोय. ज्युवेनाईल अॅक्टनुसार तीन वर्षांच्या शिक्षेनंतर त्याला सोडण्यात आलं. या अल्पवयीन आरोपीच्या पुनर्वसनाची जबाबदारी सोपवल्या गेलेल्यांपैकी एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, 'आफ्टर केअर' प्रोग्रामनुसार या आरोपीची ओळख जाहीर केली जाऊ शकत नाही.
अल्पवयीन आरोपीला २० डिसेंबर २०१५ रोजी सोडण्यात आलं होतं. त्याच्या जीवाला धोका असल्याचं ओळखून अधिकाऱ्यांनी त्याला एका गुप्त जागेवर ठेवलं होतं. त्यानंतर त्याला एका एनजीओकडे ठेवण्यात आलं. काही दिवसांनी त्यानं एका दक्षिण भारतातल्या रेस्टॉरन्टमध्ये कूक म्हणून काम सुरू केलं. मुलाच्या सुरक्षिततेसाठी जिथं तो काम करतोय तिथही कुणाला त्याच्याबद्दल फारशी माहिती देण्यात आलेली नाही.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हा अल्पवयीन उत्तरप्रदेशचा रहिवासी होता. कामाच्या निमित्तानं तो दिल्लीत दाखल झाला आणि पैसे कमावण्याच्या नादात तो राम सिंहच्या संपर्कात आला. राम सिंहनं त्याला बस साफ करण्याचं काम दिलं होतं.