www.24taas.com, झी मीडिया, रायपूर
मगरी सोबतच्या युद्धात विजय महिलांचा झाला. बातमी आहे छत्तीसगढची राजधानी रायपूर परिसरातली. रायपूरपासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेमेतरा इथल्या बाबा मोहतरा इथं सोमवारी महिला आणि मगरीमध्ये युद्ध रंगलं. ११० वर्षीय मगरीच्या तोंडचा घास बनण्यापासून तीन महिलांनी एकीला वाचवलं आणि हे युद्ध जिंकलं.
बेमेतरा जिल्हा मुख्यालयापासून केवळ १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या बाबा मोहतरा इथं चार जुने तलाव आहेत. पुराणापासून इथले मठाधिपती इथं मगर पाळतात. जुन्या ग्रामस्थांच्या मते तलावातली मगर जिचं नाव गंगाराम आहे आणि तिचं वय ११० वर्ष आहे. आतापर्यंत कोणत्याही प्राणी आणि माणसावर तिनं हल्ला केला नव्हता. तलावात माणसांसोबत मगरही राहत होती.
मात्र घटनेच्या दिवशी तलावात आंघोळ करण्यासाठी आलेल्या महिलेचा पाय मगरीनं आपल्या दातात पकडला. महिलेला ओढून मगर आत पाण्यात नेण्याआधीच तिथं उपस्थित इतर महिलांनी आपलं साहस दाखवत त्या महिलेला हात धरुन बाहेर काढलं. मगर आपल्या तोंडातून महिलेचा पाय काही केल्या सोडत नव्हती. मात्र तिथं उपस्थित महिलांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. बाजुलाच असलेली मच्छरदानी त्यांनी पाण्यात फेकली. त्यामुळं मगरीचं लक्ष विचलीत झालं. शेवटी मगर पाय सोडून पाण्यात निघून गेली. नंतर जखमी महिलेला रायपूरच्या आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक वर्षांपूर्वी तलावात मगरी पाळल्या गेल्यात. इथं पहिले ५-६ नर आणि मादा मगर होते. अनेक वेळा त्यांनी तलावात अंडीही घातली. नंतर एक-एक करुन सगळ्या लहान मगरींचा मृत्यू होऊ लागला. तर काहींना मगरीनंच खाल्लं. आता फक्त इथं एक मगर जीवंत आहे. गावकऱ्यांनी सांगितलं कि ३०-४० वर्षांपूर्वी ही मगर तलावातून निघून बाहेर दोन किलोमीटरवर असलेल्या गावात शेतात आली होती. मगरीचं शेपूट लागल्यानं एक शेतकरी जखमीही झाला होता. ज्याचा लगेच सहा महिन्यांनी मृत्यूही झाला.
तर दोन महिन्यांपूर्वी तलावाजवळ असलेल्या पुलामध्ये मगरीचं तोंड फसलं होतं. गावकऱ्यांनी ते बाहेर काढून मगरीला पुन्हा तलावात सोडलं होतं. अशाप्रकारे अनेकदा ही मगर पाण्याबाहेर आली होती. पण तिनं कधी आक्रमण केलं नव्हतं. मात्र आता असं का झालं? याचा शोध ग्रामस्थ घेत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.