नवी दिल्ली : केंद्र सरकार दोन हजारांच्या नोटा रद्द करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. पण या सगळ्या चर्चा सरकारनं फेटाळून लावल्या आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी राज्यसभेत सांगितलं.
नोटा बंद होणार असल्याच्या अफवांबाबत काँग्रेस खासदार मधुसूदन मिस्त्री यांनी राज्यसभेत प्रश्न विचारला, याला उत्तर देताना रिजीजू यांनी ही प्रतिक्रिया दिली. नोटबंदीनंतर दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आल्या. या नोटांसाठी वापरण्यात आलेला कागद निकृष्ठ दर्जाचा आहे. त्यामुळे या नोटा ओळखणं सहज शक्य होतं, असं रिजीजू म्हणाले.
याचबरोबर नोटांमध्ये आता नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे नोटांची नक्कल करता येणार नाही, असा विश्वास रिजीजू यांनी व्यक्त केला आहे.