www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘सीबीएससी’च्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मराठ्यांचा इतिहास अवघ्या दीड पानात गुंडाळल्याचा मुद्दा आज संसदेत गाजला.
राज्यसभेत शिवसेनेचे भारतकुमार राऊत यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधत सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर तीव्र शब्दांत टीका केली. भाजपचे रविशंकर प्रसाद यांनीही सरकारनं याची तातडीनं दखल घ्यावी, अशी मागणी केली. त्यावर संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी शिक्षण खात्याच्या लक्षात ही गोष्ट आणून दिल्याचं सांगत यावर उचित कारवाई होईल असं आश्वासन दिलंय.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज ते अटकेपार झेंडे लावणारे पेशवे, तसंच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीची बिजे रोवणारे चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके आणि स्वातंत्र्यवीर सावरकर... पण या महापुरूषांना ‘सीबीएससी’च्या इतिहासाच्या पुस्तकातून वगळण्यात आलंय. ‘सीबीएससी’च्या सातवी ते बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये एकून २१०० पानांचा इतिहास आहे. १७ व्या आणि १८ व्या शतकातील इतिहासासाठी त्यातील तब्बल २५० पाने आहेत. मात्र, मराठ्यांचा इतिहास केवळ दीड पानांतच उरकलाय आणि त्यातही फक्त चार ओळींमध्ये शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करण्यात आलाय. याउलट ज्या नादिरशाहने भारताची लूट केली त्याची मात्र इत्यंभूत माहिती या पुस्तकात दिली गेलीय.
‘सीबीएससी’च्या पुस्तकात मराठ्यांचा इतिहास कशा पद्धतीनं गुंडाळण्यात आलाय, हे झी मीडियानं सर्वप्रथम उजेडात आणलं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.