www.24taas.com, पीटीआय, जयपूर
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेलीने कोहलीच्या ‘विराट` खेळीसमोर नतमस्तक होऊन म्हटलं आहे की, विराटच्या खेळीमुळे आमच्या ३६० धावांच्या आव्हानाची हवाच काढली गेली. हे आव्हान म्हणून राहिलेच नाही. माझ्याकडे पराभवाचे कारण सांगण्यास शब्दच नाहीत. विराटमुळेच सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने फिरला.
विराट कोहली आणि धवन यांच्या तडाखेबंद फलंदाजीने सामना एकतर्फी केला. मात्र, विराटच्या झंझावाताने आमच्या हातून सामना निसटला. त्याच्या खेळीचे कौतुक करतांना बेली म्हणतो, त्याची खेळी लाजवाबच होती. सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेली प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होता.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत पाच गडी गमावत ३५९ धावा केल्या होत्या. भारताने हे आव्हान फक्त ४३.३ षटकांत आणि तेही एक गडी गमावत पूर्ण केले.
भारताची फलंदाजांची फळी कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळ करण्यास सक्षम झाल्याचे त्याने म्हटले आहे. तो पुढे म्हणतो की, `भारताची फलंदाजांची फळी जबरदस्त तयार झाली आहे. टीम इंडियाचे पहिले सात फलंदाज एकदिवसीय क्रिकेटचे स्पेशालिस्ट आहेत. सध्या त्यांची फलंदाजी उत्कृष्ट होत आहे.
कोहलीचा झंझावात थांबवण्यासाठी केलेला शॉर्टबॉलचा मारा निकामी ठरला का, असे विचारले असता त्याने सांगितले. `तसं मला वाटत नाही. कोहलीने शॉर्ट चेंडूवर चौकार मारले असे प्रांजळपणे कबूल केले. गेल्या दोन्ही सामन्यात आमची फलंदाजी चांगली झाली ही बाब आमच्यासाठी सकारात्मक आहे, कोहलीने कोणताही धोका न पत्करता पहिल्या चेंडूपासूनच आमच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवून आम्हांला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.