www.24taas.com, इस्लामाबाद
अबुधाबीहून नवी दिल्लीला येणा-या एअर इंडियाच्या विमानाचं आज पहाटे पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना एअर इंडियाच्या विशेष विमानानं त्यांना दिल्लीला आणण्यात आलं आहे.
अबुधाबीहून १३० प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान दिल्लीच्या दिशेनं निघालं होतं. मात्र काही वेळातच या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यानं तातडीनं कंट्रोल रुमशी संपर्क साधला. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील नवाबशाह विमानतळ जवळ असल्यानं एअर इंडियाच्या अधिका-यांनी त्यांच्याकडून लँडिंगची परवानगी मिळवली. त्यानंतर पायलटने अत्यंत काळजीपूर्वक विमान उतरवलं.
पहाटे साडेतीनच्या सुमारास हे इमर्जन्सी लँडिंग झाल्याचं सांगण्यात आलं. एअर इंडियाने आपले काही इंजीनिअर एका विशेष विमानानं नवाबशाहला पाठवले असून याच विमानानं सर्व प्रवाशांना दिल्लीला पोहोचले आहेत.