www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी शुक्रवारी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाकिस्तान दौऱ्याचं आमंत्रण दिलंय. झरदारी यांनी या निमंत्रणाची औपचारिकरित्या घोषणाही केलीय. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना जोर मिळेल, अशी आशा झरदारी यांना आहे. पाकिस्तानच्या या दौऱ्यात मनमोहन सिंग यांना पंजाब प्रांतातील आपल्या मूळ गावालाही भेट देता येईल.
पाकिस्तान उच्च आयोगाच्या साहाय्यानं झरदारींनी दिल्लीमध्ये भारताच्या पंतप्रधानांना हे निमंत्रण धाडलंय. ‘पाकिस्तान दौऱ्यासाठी आमंत्रित करताना आम्हाला खूप आनंद होतोय’, असं झरादारींनी म्हटलंय. नोहेंबर महिन्यात गुरुनानक जयंती निमित्तानं पंतप्रधानांनी या दौऱ्याचं आयोजन केलं तर पाकिस्तानी जनतेलाही आनंद होईल. आणि दोन्ही देशांत आंतरधर्मीय सद्भावनाही वाढीस लागेल, असं झरदारी यांनी पंतप्रधानांना या आमंत्रणात सुचवलंय. यावर्षी २८ नोहेंबर रोजी गुरुनानक जयंती साजरी होतेय.
पाकिस्तान दौऱ्यासाठी भारताच्या पंतप्रधानांना आमंत्रण धाडण हे एक मोठं पाऊल आहे. द्विपक्षाय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सुधारण्यासाठी यामुळे मदतच मिळेल, असंही झरदारी यांनी म्हटलंय. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाकिस्तान सरहद्दीतल्या पंजाब प्रांतातल्या आपल्या पारंपारिक घराला भेट देण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी झरदारींनी स्विकारलीय.
.