पाक बॉम्बस्फोटात नऊ जखमी

पाकिस्तानात पश्चिम भागात असलेल्या अकोरा खट्टक शहरात सामान्य नागरिकांना आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाचा सामना करावा लागला. या बॉम्बस्फोटात पोलिस अधिकारी आणि पत्रकारांसहित नऊ जण जखमी झाले आहेत.

Updated: May 10, 2012, 01:03 PM IST

www.24taas.com, पेशावर

पाकिस्तानात पश्चिम भागात असलेल्या अकोरा खट्टक शहरात सामान्य नागरिकांना आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाचा सामना करावा लागला. या बॉम्बस्फोटात पोलिस अधिकारी आणि पत्रकारांसहित नऊ जण जखमी झाले आहेत.

 

स्थानिक पोलिस अधिकारी ह्यात उल्लाह यांच्या माहितीनुसार, या भागात दोन बॉम्बस्फोट घडवले गेले. पेशावरपासून जवळजवळ ४० किलोमीटर अंतरावर पूर्व भागातील पश्तून राष्ट्रवादी नेते अजमल खट्टक यांच्या कबरीजवळ हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. या हल्ल्यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार हल्ल्याच्या अगोदर तीन वेळा स्फोटकं या ठिकाणी आणण्यात आली होती. स्फोट झाल्यावर मोठा आवाज झाला पण मोठी हानी झाली नाही.

 

पहिल्या स्फोटानंतर पत्रकार घटनास्थळी दाखल झाले. ते माहिती गोळा करत असतानाच रिमोट कंट्रोलच्या साहाय्यानं दुसरा स्फोट घडवण्यात आला. यामध्ये पाच पोलिस अधिकारी आणि चार स्थानिक पत्रकार जखमी झाले आहेत. दोन स्फोट जवळजवळ एक तासांच्या अंतरानं घडवण्यात आले. आत्तापर्यंत कुणीही या घटनेची जबाबदारी स्विकारलेली नाही परंतू इस्लामी उग्रवाद्यांचा या घटनेत हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.