मिट रोमने नेवाड्यात विजयी

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या नामांकन स्पर्धेत आघाडीवर असणाऱ्या मिट रोमने यांनी आपल्या तीन प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत नेवाडा राज्यात सहज विजय मिळवला

Updated: Feb 5, 2012, 10:51 AM IST

www.24taas.com, नेवाडा

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या नामांकन स्पर्धेत आघाडीवर असणाऱ्या मिट रोमने यांनी आपल्या तीन प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत नेवाडा राज्यात सहज विजय मिळवला. रोमने यांना या विजयामुळे राष्ट्रध्यपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. रोमने यांनी दहा टक्के मतमोजणीनंतर ४८ टक्के मते प्राप्त केली.

 

रोमने यांना मिळालेली मते त्यांचे प्रतिस्पर्धी गिंगरिच आणि रॉन पॉल यांच्या पेक्षा दुप्पट आहेत. रोमने यांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली तसंच आता पर्यंत पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला. आता मंगळवारी मिनेसोटा, कोलोराडो आणि मिसौरी राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत रोमने आपली विजयी घोडदौड कायम ठेवतील अशी शक्यता आहे. रोमने यांनी मागच्या मंगळवारी फ्लोरिडात गिंगरिच यांच्यावर मोठ्या फरकाने विजय मिळवला. रोमने यांनी भक्कम आर्थिक आणि संघटन सामर्थ्याच्या बळावर नेवाड्यात ५१ टक्के मते मिळवत मोठ्या फरकाने विजयाची नोंद केली.

 

अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या नाजूक स्थितीत असून रोमने यांनी आपली यशस्वी व्यवसायिक पार्श्वभूमी आणि त्याजोगे अर्थव्यवस्था गतीमान करण्याची खात्री मतदारांना पटवून दिल्यामुळे त्यांना सहज विजय प्राप्त करता आला.