www.24taas.com, वॉशिंग्टन
लष्कर ए तोयबाचा पाकिस्तान – अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली याचा मुंबई दहशतवादी हल्ला आणि अन्य दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आता स्पष्ट झालाय. यासाठी हेडलीला ३० ते ३५ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला जावा, अशी मागणी अमेरिका सरकारनं केलीय. तसंच हेडलीला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी अमेरिकेनं स्पष्ट नकार दिलाय.
‘हेडली यानं केलेला अपराध हा केवळ निंदनीयच आहे. पण त्याचा या गुन्ह्यातील सहभागासाठी त्याला ठोठावली जाणारी शिक्षाही तितकीच महत्त्वाची ठरेल कारण, त्यानं दहशतवादाशी लढण्यासाठी अमेरिका सरकारची मदतदेखील केलीय’ असं अॅटर्नी जनरल गॅरी एस. शप्रियो यांनी सरकारनं केलेल्या मागणीचं स्पष्टीकरण दिलंय.
अमेरिकेनं हेडलीसाठी ३०-३५ वर्षांच्या शिक्षेची मागणी केलीय, जी त्याप्रमाणात तहव्वुर हुसैन राणा प्रकरणात ठोठावण्यात आलेल्या शिक्षेपेक्षा कमीच आहे. लष्कर ए तोयबाच्या मदत करण्याच्या आरोपावरून राणा याला दोषी ठरवत १४ वर्षांची सजा सुनावण्यात आलीय तसंच त्यानंतर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पुढचे पाच वर्ष त्याला नजरकैदेत ठेवलं जाणार आहे.
‘हेडलीचा दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी योजना बनवण्यात सक्रिय सहभाग होता. भारतातील मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास १६४ पुरुष, महिला आणि लहान मुलं मृत्यूमुखी पडले होते तसंच कित्येक लोक जखमी झाले होते’ असं अमेरिकेनं स्पष्ट केलंय. शप्रियोच्या म्हणण्यानुसार २००८ मध्ये मुंबईमध्ये घडवून आणलेल्या या विनाशानंतरही जवळपास दोन महिने हेडलीनं आणखी एक दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यासाठी डेन्मार्कचा दौरा केला. ते लष्कर ए तोयबासोबतच अलकायदाच्या सदस्यांच्या आदेशावरून हे काम करत होता. हेडलीच्या या कृत्यासाठी त्याला आजीवन कारावासाची शिक्षा योग्य राहील, याबाबत दुमत नाही पण त्यानं अमेरिका सरकारला चौकशीत मदत केली, त्यामुळे ३०-३५ वर्षांची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी अमेरिका सरकारच्या वतीनं शप्रियो यांनी केलीय.