www.24taas.com, बगदाद
सौदी अरेबियात सात अल्पवयीन गुन्हेगारांचा आज शिरच्छेद करण्यात येणार आहे. या गुन्हेगारांनी जेव्हा गुन्हा केला होता, तेव्हा त्यांचं वय १८ वर्षांपेक्षाही कमी होतं. ही शिक्षा रोखण्यासाठी जगभरातून प्रयत्न होत आहे. मात्र त्यांना यश आलेलं दिसत नाही.
सौदी अरेबियात ७ अल्पवयीन मुलांनी २००६ साली बँक लुटली होती. यानंतर त्यांच्यावर खटला दाखल केला गेला. २००९ साली या सर्व आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. जगभरातल्या मानवाधिकार समित्यांनी याबद्दल सौदी अरेबियाच्या सरकारकडे गुन्हेगारांना जीवनदान देण्याची मागणी केली होती.
सातही आरोपींचे अमानुष हाल करून आणि उपाशी ठेवून त्यांना गुन्हा कबूल करण्यास प्रवृत्त केलं गेलं असल्याचं मानवाधिकार समितींचं म्हणणं आहे. २४ तास या सात गुन्हेगारांना अन्न- पाणी काही न देता त्यांना उभं करून मारण्यात आलं. एवढे हाल केल्यावर सातही आरोपींनी निलाजाने गुन्हा कबूल केला होता.
सौदी अरेबियात कुणावरही जुलूम केले जात नसल्याचं अरेबियाच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे. आमच्या देशातील कायदेव्यवस्था इस्लाम प्रणित असल्यामुळे इथे सर्वांना न्याय मिळतो, असंही तेथील मंत्र्यांचं म्हणणं आहे. मात्र तेथे वारंवार दिल्या जाणाऱ्या अघोरी मृत्यूच्या शिक्षांचा जगभरातून निषेध केला जातो. दोन वर्षांपूर्वीही ८ बांग्लादेशी नागरिकांना सौदी अरेबियात मृत्यूची शिक्षा दिली होती.