www.24taas.com, झी मीडिया, मॉस्को
खूप प्रतिक्षेनंतर `आयएनएस विक्रमादित्य` ही विमानवाहू नौका आज भारतीय नौदलात दाखल झालीय. मागील पाच वर्षांपासून विविध कारणांमुळं ही प्रलंबित राहत होती. सेवरोदविंस्क या बेटावरील एका कार्यक्रमात रशियानं ही नौका आज भारताला सोपवली. या नौकेमुळं भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे.
संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी, रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोजिन आणि दोन्ही देशांच्या सरकारी आणि नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. २००४मध्ये एनडीए सरकारच्या काळात या युद्धनौकेच्या खरेदीसाठी रशियासोबत ९४.७ कोटींचा करार झाला होता. पण भारतीय नौदलाच्या ताफ्यात तिचं आगमन पाच वर्ष लांबलं. या काळात तिच्या दुरुस्तीचा खर्चही अनेक वेळा वाढला, त्यामुळं हा खर्च २.३अब्ज डॉलर झाला आहे. अशा तीन नौका २०२०पर्यंत ताफ्यात असण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे.
या युद्धनौकेची लांबी २८४ मीटर आहे. ही नौका ६० मीटर उंच आहे म्हणजेच जवळपास २० मजली इमारतींएवढी आहे. यावर १६०० नौसैनिक तैनात असतील. तर युद्धनौकेचं वजन तब्बल ४४ हजार ५०० टन आहे. तर नौकेवर मिग-२९के, कॅमोव्ह ३१, कॅमोव्ह २८ हे विमान तैनात करण्यात येतील.
‘विक्रमादित्य’ ही कीव्ह प्रकारातील युद्धनौका १९८७मध्ये बाकू या नावानं रशियन नौदलात दाखल झाली होती. त्यानंतर तिचं नामकरण ‘अॅडमिरल गॉर्शकॉव्ह’ असं करण्यात आलं. ही युद्धनौका भारतात सामील होण्यापूर्वी १९९५मध्ये ती रशियन नौदलातून निवृत्त झाली. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ही नौका ताफ्यात आल्याबद्दल अँटोनी यांनी समाधान व्यक्त केलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.